Menu
Log in
Log in

Blog

  • 6 Oct 2020 9:10 AM | SPMES Mandal (Administrator)

    “या नभाने या भुईला दान द्यावे;आणि या मातीतून चैतन्य गावे..”*.. पण सततच्या दुष्काळाने ही चैतन्याची परंपरा अखंड राहील की नाही अशी स्थिती ५/६ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील नजिकपांगरी परिसरात होती. नंदकिशोर वाघ, इथले एक प्रगतीशील शेतकरी; यांना व या परिसरातील इतरांना देखील आपल्या द्राक्षबागा पाण्याअभावी मोडून टाकाव्या लागल्या होत्या. सावित्रीबाई फुले मंडळाने ग्रामस्थ व प्राज फाऊंडेशन, नाबार्ड (नजिकपांगरी), ग्राईंड मास्टर, विनोदराय इंजिनियरिंग (केळीगव्हाण) यांच्या भक्कम पाठिंब्यानं पाण्याची कामं पूर्ण केली. आता कमी पाऊस पडूनही इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आहे. पाण्यासोबतच कृषी विस्तार कार्यक्रमामुळे पीक पद्धती बदललीय. ‘मी आता रेशीम शेतीतून दरवर्षी २ लाख कमवतो’ नंदकिशोर वाघ अभिमानानं सांगतात! शाश्वत जलस्त्रोत विकास, पाणलोट विकास कार्यक्रम, जलसाक्षरता, एकात्मिक पोषण व कीड नियंत्रण, शेतकी उत्पाद कंपन्या या सर्व प्रकल्पांद्वारे ७२ गावं आणि १५००० हून अधिक आनंदी शेतकरी परिवार ही सावित्रीबाई फुले मंडळाच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाची आजवरची कमाई!! (* पद्मश्री ना. धों. महानोर यांची कविता)

  • 6 Oct 2020 9:06 AM | SPMES Mandal (Administrator)

    ‘जेथ संपत्ती आणि दया। दोन्ही वसतीं आलिया ठाया। तेथ म्हणे धनंजया। वसती माझी॥’ (ज्ञानेश्वरी)शहरातील दोन प्रथितयश उद्योजक- श्री विवेक कोरांगळेकर आणि श्री शिरीष लोया यांनी सावित्रीबाई फुले मंडळाच्या कामात आपला वेळ देऊन मूल्यवर्धन करायचं ठरवलं. आज ते मंडळाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या उपेक्षित वस्त्यांतील महिला पुरुषांना त्यांचे व्यवसाय सुरु करायला सर्वतोपरी मदत करताहेत. ब्रँडिंग, आ‌ॅनलाईन मार्केटिंग, कर्ज या व्यवसाय उभारणीच्या अत्यावश्यक गोष्टींत मदत करताहेत. यातून अनेकजण पहिल्यांदाच व्यवसायिक बनताहेत. सावित्रीबाई फुले मंडळाबरोबर राहून असं अर्थपूर्ण सामाजिक काम करणारी स्वयंसेवी प्रोफेशनल्सची टीम हे आमचं बलस्थान आहे.

  • 6 Oct 2020 9:02 AM | SPMES Mandal (Administrator)

    जिथं बहुतेक मुली दहावीच्या पुढे शिकत नाहीत आणि अत्यंत कमी वयात मुलींची लग्नं होतात….तिथं प्रियंका एक आदर्श ठरतेय. लहानपणापासून तिच्या मामांनी तिच्यावर चांगले संस्कार केलेआणि किशोरी विकास प्रकल्पात व्यक्तिमत्व विकास होत गेला. दहावीला ८६ टक्के मार्क्स घेत प्रियंका आता पदवी पूर्ण करतेय. किशोरी प्रकल्पातच कराटेची गोडी लागली आणि निरनिराळ्या स्पर्धांतून तब्बल ७० पदकांची कमाई तिनं आजवर केलीय! त्याबरोबरच किशोरवय आणि आरोग्यभान या बद्दल मुलींना समुपदेशन करणारी एक जबाबदार कार्यकर्ती देखील ती बनलीय. Minex Foundation च्या सहकार्यानं सावित्रीबाई फुले मंडळ २० गावं आणि २० शहरी वस्त्यांतून ५००० किशोरींसोबत काम करतंय. योग्य वेळी प्रकल्पाची साथ आणि समुपदेशन यामुळं प्रियंकासारख्या किशोरींना व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक संधी मिळाल्यात.

  • 6 Oct 2020 8:57 AM | SPMES Mandal (Administrator)

    “नववधु प्रिया मी बावरते..”पण आमचा तेजस्विनी प्रकल्प आहे ना! त्यामुळं नववधू- वरांना; विशेषत: उपेक्षित वस्त्यांतील; चिंता करायचं कारण नाही! नियमितपणे होणाऱ्या या अफलातून ‘नवदाम्पत्य कौतुक सोहळा’ उपक्रमाचे दूरगामी सांस्कृतिक व सामाजिक परिणाम आता दिसताहेत. अत्यंत सुनियोजित पद्धतीने दरवर्षी ५०० नवविवाहित जोडप्यांना सावित्रीबाई फुले मंडळा तर्फे सन्मानाने आमंत्रित केलं जातं. त्यांनी छान नटून थटून यावे हा आग्रह असतो. केन्द्रावरील डाॅक्टर पतीपत्नी सोबत गोडधोड खायचं, उखाणे घ्यायचे, मिरवायचे, लाजायचे… कुटूंबासारखी मजा करायची. पण सोबतच अनेक विषय शिकायचे. – वैवाहिक संबंध जोपासायचे कसे?- प्रजनन आरोग्याची माहिती. – कुटूंब नियोजनाचे महत्व- नाती टिकवायची कशी?.. आणि अजून बरेच काही!या सर्व जोडप्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा !!

  • 6 Oct 2020 8:32 AM | SPMES Mandal (Administrator)

    कोविड लाॅकडाऊन मध्ये सर्वच शाळा हळूहळू ‘आ‌ॅनलाईन’ झाल्यात. मात्र ‘विशेष मुलांच्या’ शाळांना आ‌ॅनलाईन होणं फारच कठीण असतं! पण #विहंग च्या टीमने हे करून दाखवलंय! – पालकांसाठी कार्यशाळा; सपोर्ट ग्रुप. – व्हिडीयो काॅल्स, समाजमाध्यमांचा उपयोग. – सरकारच्या ‘दिशा’ पोर्टलबरोबर काम. – शाळा बंद असल्यानं पालकांवर अतिरिक्त ताण. त्यासाठी समुपदेशन. – नव्याने विकसित प्रभावी आ‌ॅनलाईन अभ्यासक्रम. – यासाठीच विहंगचे अँड्राॅईड ॲप लवकरच येत आहे. या सगळ्यांतून #विहंग नी आ‌ॅनलाईन भरारी घेत विशेष मुलांच्या पालकांची मोठी अडचण सोडवली आहे!

  • 6 Oct 2020 8:02 AM | SPMES Mandal (Administrator)

    कोविडचा लाॅकडाऊनचा काळ.. सर्वसामान्य आरोग्य सेवा विस्कळीत झालेल्या. तशात या मातेची जोखमीची गर्भावस्था; परिवारजन काळजीत. सावित्रीबाई फुले मंडळाच्या लहुजी साळवे आरोग्य केंद्राच्या टीमने योग्य त्या उपचारांसोबत वारंवार समुपदेशन करून धीर दिला. गुंतागुंत टळली, रुग्णालयात सुखरूप प्रसुती झाली आणि रिद्धी- सिद्धीचे परिवारात सुखद आगमन झाले! दरवर्षी या केंद्रावर १६०० तर मंडळाच्या सर्व उपक्रमांत मिळून ७००० गर्भवतींना वारंवार तपासणी, औषधी, चाचण्या, समुपदेशन तसेच रेफरल सुविधा अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून दिल्या जातात. शहरी झोपडपट्टी वस्त्या, दुर्गम गावे आणि वनवासी पाड्यांवर ANC Clinics आणि Care Mother Kit/ App द्वारे दिल्या जाणाऱ्या या सुविधांनी माता बाल आरोग्यातील पथदर्शी काम उभे राहिले आहे.

Powered by Wild Apricot Membership Software