08 Jun 2025
सकस आहाराचा अभाव, मासिक पाळी अन् बदलती जीवनशैली या कारणांनी महिलांमधील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होत आहे. सावित्रीबाई फुले एकात्म मंडळातर्फे राबवलेल्या रमा प्रकल्पाद्वारे ११ हजार महिलांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी ७० टक्के महिला अॅनिमियाग्रस्त होते. या महिलांचे आहाराचे महत्व, रक्तवाढीसाठी घरातील खाद्यपदार्थांच्या रेसिपीद्वारे जनजागृती करत ६५ टक्के महिला अॅनिमियातून मुक्त झाल्या. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ग्राईंड मास्टर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रमा आयडॉल पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मिलिंद केळकर, मोहिनी केळकर, गुरुवर्य लहुजी साळवे केंद्राचे डॉ. दिवाकर कुलकर्णी, सविता कुलकर्णी यांची उपस्थिती होती. मोहिनी केळकर यांनी सांगितले की, महिला अबला नसून सबला आहे. महिलांना मदतीची नाही तर संधीची गरज आहे. महिलांचे आरोग्य कसे चांगले राहील, त्यासाठी काय काम करता येईल, हे सुद्धा पाहिले पाहिजे. महिलांनी वर्षभरात २० महिलांना अॅनिमियापासून मुक्त करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. या वेळी कार्यक्रमात ज्या महिलांचे हिमोग्लोबीन आठ ग्रॅमपेक्षा कमी होते, त्यांच्यासाठी १२९२ महिलांना लोखंडाची कढई वाटप केली. या वेळी मनोरंजनात्मक खेळ महिलांनी घेतला. यात प्रथम क्रमांक आलेल्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. पिराजी कमले यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक वर्षा पिंपळे देशमुख तर आभार अश्विनी शिंदे यांनी मानले. सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचा उपक्रम मुकुंदवाडी परिसरात आयोजित आदर्श रमा आयडॉल पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला १८ महिलांना रमा पुरस्कार गेल्या चार वर्षांपासून प्रकल्पात विविध महिला अॅनिमियावर जनजागृती करण्याचे काम करत आहेत. यातील ५० महिलांपैकी १८ महिलांना रमा आयडॉल पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये महिलांमध्ये अॅनिमियाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच मागील चार वर्षांमध्ये अॅनिमियावर झालेल्या कामाची माहिती देण्यात आली. पंधरा वस्त्यांमध्ये प्रकल्पाचे काम यामध्ये मिलिंदनगर, मुकुंदनगर, राजनगर, सातारा गाव, नागसेननगर, फुलेनगर, रामनगर, राहुलनगर, नाथनगरसह इतर नगरांमध्ये १६० आरोग्य मित्र काम करत आहे. हिमोग्लोबीन ८ वरून गेले १४ वर सुरुवातीला माझे हिमोग्लोबीन ८.५ होते. प्रकल्पात आल्यानंतर मार्गदर्शन घेऊन आहारात योग्य बदल केला. त्यामुळे माझे हिमोग्लोबीन १४.१ वर पोहोचले. - मनीषा पगारे, रमा आयडॉल पुरस्कार्थी ॲनिमियाग्रस्तांनी असा घ्यावा आहार शेंगदाणे - गुळ खावे, बाजरीची खिचडी, आळीवाचे लाडू- खीर, विविध डाळींचे थालीपीठ, बीटचा ज्यूस, राजगिरा लाडू, शेंगदाण्याचे लाडू, विविध पालेभाल्यांचे थालीपीठ, मुटकुळे, तिरंगी पदार्थमध्ये कडधान्ये, लालरंगाची फळे, पांढऱ्या रंगाचे दुग्धजन्य पदार्थ खावे.